001-234-567-8910

5th Avenue Madson, NY758, USA

Get Update on our recent Gadgets & Tabs

Showing posts with label गुरु ठाकूर. Show all posts
Showing posts with label गुरु ठाकूर. Show all posts

Thursday, 15 December 2016

Kalale Nahi Kadhi | Guru Thakur | Marathi Kavita

चित्रपट: शिक्षणाच्या आयचा घो
कळले नाही कधी

कळले नाही कधी उसवले लक्तर जगण्याचे
गेले फाटून उडण्या आधी पतंग स्वप्नांचे


नशिबी आली फरपट माझ्या कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात

चुकली सारी गणिते केवळ शून्य उरे हाती
उडूनी गेली वर्षे झाली जन्माची माती

पसार झाली नाती सारी सोडून अंधारात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात

जाती भावना जळूनी जेव्हा व्यवहारी जग छळते
गुंता होतो जगण्याचा अन नियती भेसुर हसते

चुकले कोठे कळण्या आधी होते वाताहात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात

_गुरु ठाकूर

Wednesday, 23 November 2016

Amhi Kadhich Petun Uthat Nahi | Guru Thakur | Marathi Kavita

आम्ही कधीच पेटून उठत नाही

आम्ही कधीच पेटून उठत नाही
आम्हाला कुणीतरी चिथवावं लागतं.


आमच्यातल्या विवेकाला
धर्माचं नाहीतर अस्मितेचं
गाजर दाखवून फितवावं लागतं.

मग कुठेतरी
आतून भ्याड आणि बुळे असणारे आम्ही पेटुन उठतो.

अन्‌ स्वत:च्या षंढत्वाबद्दल वाटणा-या घृणेला
कुठल्यातरी निषेधाचं लेबल लावून
मिळेल ते जाळत सुटतो.

कुठला धर्म? कुठल्या भावना?
कुठली अस्मिता? कुठल्या विटंबना

आम्हाला नसतो विधीनिषेध
आम्ही फक्त नोंदवत असतो
आमच्या लाचार कृतीशून्यते विरुद्धचा आमचा निषेध!!

_गुरु ठाकूर

Monday, 17 October 2016

Chinna mukhawata lokshahicha | Guru Thakur | Marathi Kavita

छिन्न मुखवटा लोकशाहीचा

साठी उलटली स्वतंत्र्याची
ग्लोबल झाला देश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा
विस्कटला गणवेश


केवळ टोप्या आणिक झेंडे
गहाण डोकी सारी
ठेचुनिया पुरुषार्थ ओणवी
अभिलाषेच्या दारी
पोकळ गप्पा बनेल दावे
अन् बेगडी आवेश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा
विस्कटला गणवेश

देश विकावा कुठे अन्
कसा केवळ हिशेब
गणतंत्राची माय निजवण्या
उत्सुक दलाल सारे
हपालेल्या नजरा नाही
निष्ठेचा लवलेश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा
विस्कटला गणवेश

गुरु ठाकूर

Sunday, 18 September 2016

Te Gelyawar | Guru Thakur | Marathi Kavita

तू गेल्यावर

आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे


चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

_गुरु ठाकूर

Friday, 26 August 2016

Lagale maan paratichya watevarati | Guru Thakur | Marathi Kavita

लागले मन परतीच्या वाटेवरती

लागले मन परतीच्या वाटेवरती
व्याकुळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती


वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भीजवून जातो
अर्ध्यारात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

नकोस थांबू पैलतटावर पुन्हा मांडु ये डाव पटावर
पुन्हा सावरु जरी बहरले अडसर अवतीभवती
लागले मन परतीच्या वाटेवरती

चुकले कोठे कधी कुणाचे या सा-याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधित फिरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे मीपण, शरण तुला मी पुरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

_गुरु ठाकूर

Wednesday, 10 August 2016

Pachuchya Ranat | Guru Thakur | Marathi Kavita

Pachuchya Ranat | Guru Thakur | Marathi Kavita
Pachuchya Ranat | Guru Thakur | Marathi Kavita

Pachuchya Ranat | Guru Thakur - Marathi Kavita Sangrah


पाचुच्या रानात
झिम्मड पाऊस
उनाड अल्लड वारा
नारळी पोफळीशिरल्या आभाळी
वाळूत चांदणचुरा

पिवळी पिवळी
बिट्ट्याची काचोळी
नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे
फेसाचे साजिरे
सजल्या सागर लाटा
इथल्या रानात
तसाच मनांत
झरतो मायेचा झरा
नारळी पोफळी
शिरल्या आभाळी
वाळूत चांदणचुरा

गंधीत धुंदीत
सायली चमेली
लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा
पिंपळ पसारा
जीवाला लावतो घोर
घंटेचा निनाद
घालुनिया साद
सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी
शिरल्या आभाळी
वाळूत चांदणचुरा

आंब्याला मोहर
बकुळी बहर
कहर चाफा फुले
माडाच्या सांदीला
झाडाच्या फांदीला
ईवला खोपा झुले
बोलतो कोकिळ
त्याच्या ग मंजूळ
तोंडाला नाही थारा
नारळी पोफळी
शिरल्या आभाळी
वाळूत चांदणचुरा
_गुरु ठाकूर
Hey, we've just launched a new custom color Blogger template. You'll like it - https://t.co/quGl87I2PZ
Join Our Newsletter