Thursday 19 November 2015

गाऊ त्यांना आरती (Gau tyana aarati By Yashawant)

संगरी वीराग्रणी
जे धैर्यमेरू संकटी,
जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी
कर्णापरी ज्यांना मृती,
गाऊ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी
खाचखड्डे मातले,
तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले
कृष्णापरी जे सारथी,
गाऊ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला
संक्षेप ज्यांनी जीविती,
तो परार्थी पाहती
आप्‍तविस्तारांत ज्यांच्या
देशही सामावती,
गाऊ त्यांना आरती

देश ज्यांचा देव,
त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो
दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे
जिंकिती काळाप्रती,
गाऊ त्यांना आरती

देह जावो, देह राहो,
नाहि ज्यांना तत्क्षिती,
लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी
देतात जे आत्माहुती,
गाऊ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां
अर्पिती जे लोचने,
क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा
ज्यांच्या कृती
ज्यांच्या स्मृती,
गाऊ त्यांना आरती

नेटके काही घडेना,
काय हेतु जीवना,
या विचारी मन्मना
बोधितो की
'एवढी होवो तरी रे सत्कृति,
गा तयांची आरती.'

यशवंत दिनकर पेंढरकर

No comments:

Post a Comment