Thursday 2 July 2015

झंझावात (Jhanzawaat)

जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी

झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे !
जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी

माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा
मीही अताशा एकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी

बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी

कुठल्याच दारी मी कधी नेली न कागाळी तुझी
नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजुवात मी?

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी!

मजला असे पाहू नका …. रस्त्यावरी थांबू नका
धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी!

माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी
उमटेल मी धरतीवरी ….. चमकेन त्या गगनात मी!

सुरेश भट

No comments:

Post a Comment