Thursday 9 July 2015

भल्या पहाटे निघून आले (Bhalya pahate nighun ale)

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले!
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले!

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले!

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले!

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले!

सुरेश भट

No comments:

Post a Comment