001-234-567-8910

5th Avenue Madson, NY758, USA

Get Update on our recent Gadgets & Tabs

Sunday, 3 June 2012

तुझे नाम मुखी

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥

[केशवसुतांनी त्यांच्या अखेरच्या काळात केलेली ही शेवटची कविता (अभंग)]
__कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

Saturday, 2 June 2012

Nirzaras | Tryambak Bapuji Thombre [Balkavi] | Marathi Kavita | निर्झरास

Nirzaras | Tryambak Bapuji Thombre [Balkavi]
Nirzaras | Tryambak Bapuji Thombre [Balkavi]


गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई
कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या

घे लोळण खडकारती, फिर गरगर अंगाभवती,
जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत,

पाचूंची हिरवी राने झुलव गडे, झुळझुळ गाणे ।
वसंतमंडप - वनराई आंब्याची पुढती येई

श्रमलासी खेळून खेळ नीज सुखे क्षणभर बाळ ।
हीं पुढची पिवळी शेतें सळसळती - गाती गीतें,

झोप कोठुनि तुला तरी, हास लाडक्या । नाच करी
बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे । भरिसी भुवनी ।
***

बालतरू हे चोहिकडे, ताल तुला देतात गडे!
प्रेमभरे त्यावर तूहि, मुक्त-मणि उधळून देई!

बुदबुद-लहरी फुलवेली, फुलव सारख्या भवताली
सौंदर्ये हृदयामधली, हे विश्वी उधळून खुली

गर्द सावल्या सुखदा, वेलीची फुगडी होई!
इवलाली गवतावरती, रानफुले फुलती हसती

झुलवित अपुले तुरे-तुरे, निळी लव्हाळी दाट भरे
जादूनेच तुझ्या बा रे? वन नंदन बनले सारे!

सौंदर्याचा दिव्य झरा, बालसंतचि तू चतुरा
या लहरीलहरीमधुनी, स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी
***

आकाशामधुनी जाती, मेघांच्या सुंदर पंक्ति
ती संध्या खुलते वरती, नीलारुण फलकावरती

इंद्रधनूची कमान ती, रम्य तारका लुकलुकती
शुभ्र चंद्रिका नाच करी, स्वर्गधरेवर एकपरी

ही दिव्ये येती तुजला, रात्रंदिन भेटायाला!
वेधुनि त्यांच्या तेजाने, विसरुनिया अवघी भाने

धुंद हृदय तव परोपरी, मग उसळे लहरीलहरी
त्या लहरीमधुनी झरती, दिव्य तुझ्या संगीततति!

नवल न, त्या प्राशायाला, स्वर्गहि जर भूवर आला!
गंधर्वा तव गायन रे, वेड लाविना कुणा बरे!
***

पर्वत हा, ही दरीदरी, तव गीते भरली सारी
गाण्याने भरली राने, वर-खाली गाणे गाणे!

गीतमय स्थिरचर झाले, गीतमय ब्रम्हांड झुले!
व्यक्त तसे अव्यक्तहि ते, तव गीते डुलते झुलते!

मुरलीच्या काढित ताना, वृंदावनि खेळे कान्हा
धुंद करुनि तो नादगुणे, जडताहि हसवी गाने

दिव्य तयाच्या वेणुपरी, तूहि निर्झरा! नवलपरी
गाउनि गे झुळझुळ गान, विश्वाचे हरिसी भान!

गोपि तुझ्या हिरव्या वेली, रास खेळती भवताली!
तुझ्या वेणुचा सूर तरी, चराचरावर राज्य करी
***

काव्यदेविचा प्राण खरा, तूच निर्झरा! कविश्वरा!
या दिव्याच्या धुंदिगुणे, दिव्याला गासी गाणे

मी कवितेचा दास, मला, कवी बोलती जगांतला,
परि न झरे माझ्या गानी, दिव्यांची असली श्रेणी!

जडतेला खिळुनी राही, हृदयबंध उकलत नाही!
दिव्यरसी विरणे जीव, जीवित हे याचे नाव

ते जीवित न मिळे माते, मग कुठुनि असली गीते?
दिव्यांची सुंदर माला, ओवाळी अक्षय तुजला!

तूच खरा कविराज गुणी, सरस्वतीचा कंठमणी
अक्षय तव गायन वाहे, अक्षयात नांदत राहे!
***

शिकवी रे, शिकवी माते, दिव्य तुझी असली गीते!
फुलवेली-लहरी असल्या, मम हृदयी उसळोत खुल्या!

वृत्तिलता ठायी ठायी, विकसू दे सौंदर्याही!
प्रेमझरी-काव्यस्फूर्ति, ती आत्मज्योती चित्ती

प्रगटवुनि चौदा भुवनी, दिव्य तिचे पसरी पाणी!
अद्वैताचे रज्य गडे, अविच्छिन्न मग चोहिकडे!

प्रेमशांतिसौंदर्याही, वेडावुनि वसुधामाई
मम हृदयी गाईल गाणी, रम्य तुझ्या झुळझुळ वाणी!

आणि असे सगळे रान, गाते तव मंजुळ गान,
तेवि सृष्टीची सतार ही, गाईल मम गाणी काही!
***

__[त्र्यंबक बापूजी ठोमरे] बालकवी

शारदेचे आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातुन फुटला असेल,
ज्यांचा शब्द राघवाच्या बाणासारखा सुटला असेल,
ज्यांच्या जित्या फुफ्फ्सांना छिद्र नसेल अवसानघातकी,
जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधुन उठला असेल.

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहखंडाप्रमाणे,
ज्यांच्या जिवात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे,
ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती,
धरतीला स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे.

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,
मुर्तिमंत मृत्युचीही आमने-सामने भेट होता,
ज्यांच्या थडथड नाडीमधला एक ठोका चुकला नसेल.

ज्यांच्या अस्थी वज्र-बीजे.....नसांत उकळणारे रक्त,
शारदेचे आमंत्रण आज, त्यांनाच आहे फक्त...

___वसंत बापट

Friday, 1 June 2012

माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

__नारायण सुर्वे

Thursday, 31 May 2012

Jallianwala bagh | Kusumagraj | Marathi Kavita

Kusumagraj - Vishnu Vaman Shirwadkar.
(Born: 27 February 1912, Died: 10 March 1999)

जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे


मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

__कुसुमाग्रज [By Kusumagraj]

Wednesday, 30 May 2012

Japani Ramalachi Ratra | B B Borkar | Marathi Kavita

Balakrishna Bhagwant Borkar
(Born: 30 November 1910, Died: 8 July 1984)

जपानी रमलाची रात्र

तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात


रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड

अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया

धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री

तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला

अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ

जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी

तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल

करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले

अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ

स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी

पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे

आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज

नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र

कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते

गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ

डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी

तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता

आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!

__ बा. भ. बोरकर

Tuesday, 29 May 2012

Aanibaani | Anil | Marathi Kavita

Anil – [A R Deshpande] Atmaram Raoji Deshpande.
(Born: 11 September 1901, Died: 8 May 1982)

आणिबाणी

अशा काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसे उरलो नसतो


वादळ असे भरून आले
तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या
काही सावरणार नव्हते

हरपून जावे भलतीकडेच
इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो इतके
पेटून आले होते रान

असे पडत होते डाव सारा
खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते
जीव पुरा वीटून जावा

कसे निभावून गेलो
कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते
नुसते हाती हात होते!

_अनिल [By Anil]
Hey, we've just launched a new custom color Blogger template. You'll like it - https://t.co/quGl87I2PZ
Join Our Newsletter