Tuesday, 3 July 2012

विरामचिन्हे

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!

आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.

अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !

झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !

आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !

__गोविंदाग्रज [राम गणेश गडकरी]

No comments:

Post a Comment