Tuesday, 12 June 2012

Dola vatuli Sampena | Indira Sant | Marathi Kavita

Indira Sant
(Born: 4 January 1914, Died: 2000)

डोळा वाटुली संपेना

इथे रंगली पंगत
मिटक्यांची भुरक्यांची,
साधासुधा माझा हात
बाळजीभ अमृताची


इथे चालला अभ्यास
इथे झाली भातुकली,
गोष्टी, गाणी नि मस्करी
खोली भरून राहिली

इथे घडले पतंग
इथे फिरला भोवरा,
इथे हदगा मांडला
इथे खुडला मोगरा

खेळा-शाळेच्या मागून
दूर दूर दिसाकाठी,
सांजावता, दारामधे
कमरेला घट्ट मिठी

दिसामाशी वाढताना
घर झाले हे लहान,
पालवीत पंख नवे
गेली त्याच दारातून!

सांज टळली तरीही
दार लावावे वाटेना,
"वळेल का कुणी मागे?"
डोळा वाटुली संपेना...

संपावया हवी वाट,
लावावया हवा दिवा,
पोटासाठी मुकाट्याने
हवा टाकायला तवा!

__इंदिरा संत

No comments:

Post a Comment