Sunday, 27 May 2012

प्राक्तनाचे संदर्भ

पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्याइतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणाय्रा झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा....
तिने फक्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर....
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.
त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट....
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात, तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस....

__द.बा.धामणस्कर

No comments:

Post a Comment