Tuesday 24 April 2012

जीव राखता राखता (Jeev rakhata rakhata)

जीव राखता राखता तुला हाताशी घेईन,
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन

तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा,
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा

तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन,
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन

दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना,
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना

तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी,
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी

मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन,
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन

तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल,
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल

भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग,
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग

नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल,
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

__ ग्रेस

No comments:

Post a Comment