Tuesday, 20 March 2012

Jhad | Kusumagraj | Marathi Kavita

Kusumagraj - Vishnu Vaman Shirwadkar.
(Born: 27 February 1912, Died: 10 March 1999)


झाड - कुसुमाग्रज

एकदा मध्यरात्रीच्या नीरवेतून मी ऐकला होता एक भयानक चीत्कार पलिकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुटमटातून उफ़ाळलेला.
कोणत्या तरी पक्षाची प्राणान्तिक किंकाळी जी फ़ोडीत गेली दहा दिशांच्या तटस्थ तावदानी काचा, भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदामेंदा होऊन त्याच वृक्षाच्या फ़ांद्यांतून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये. नंतर त्या किंकाळीला फ़ुटत होते धुमारे चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे, रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अनकुचीदार झटके फ़ांद्यांतून फ़ुटणार्या अपस्मारांचे. सार्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात झाले होते जागे कोठल्या तरी दानवी अत्याचाराने, आणि झाले होते स्वतःच एक अगतिक वेदनेचे वारूळ पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले आणि शृतिहीन आकाशाला हाक मारणारे. देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये. आले असेल एखादे जहर काळे रानमांजर अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद डाळणारे एका फ़ांदीवरुन दुसर्या फ़ांदीवर ललसत्या नखाळ पंजांनी चडणारे. त्याने अचानक अखेरच्या तळावरुन घेतली असेल उशी टाकली असेल झेप उषःकालाचे राजवर्खी स्वप्न पाहणार्या एखाद्या निद्रिस्त गोजिरवाण्या पाखरावर. मृत्यूच्या करवती दातांत जागृत झालेल्या त्या पाखराने फ़ोडली असेल पहिली भीषण किंकाळी आणि तुकड्यातुकड्याने शरीर फ़ुटत असताना घातल्या असतील त्या व्याकूळ विझणार्या हाका भोवतालच्या विश्वाला. नसेल रानमांजर असेल कदाचित घुबडही असेल कदाचित एखादा अजगरी सर्प कृतान्ताचे विळखे घालीत बुंध्यावरुन सरकणारा, असेल काहीही; पक्षा-ऐवजी कुरतडली गेली असतील कदाचित त्याची पिलेही, पण एक खरे की त्या दहा मिनिटांच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचे एकही पान हालले नाही, काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे शांत्–शांत! दूर झालो मी खिडकीपासून पुन्हा मोठा केला रेडियोचा मंदावलेला गाज आणि शिलगावला मेजावरचा दिवा. कोठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरापी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर, आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली माहेरवासी अधीरतेने; सावल्यात साखळेल्या भिंती मुक्त झाल्या त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे आणि उभे केले माझ्या सभोवार एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन, आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला की मी पक्षी नाही
- कुसुमाग्रज [By Kusumagraj]

No comments:

Post a Comment