Sunday, 25 December 2011

नट मित्रास पत्र



ज्येष्ठ बंधो ! साष्टांग नमस्कार !
बांधवाचा घे आधिं गुणाधार ।
मान्य करुनी ही विनंती विशेष
वृत्त ऐकें सप्रेम मम अशेष ॥१॥

पत्र पूर्वीं तुज पाठविलें त्याचें
त्वरें प्रत्युत्तर खास यावयाचें ।
असें आधीं घेतलें मन्ममनानें
परी ठरलें भलतेंच अनुभवानें ॥२॥

पाहुनियां परि गद्य पत्र याचें
कठिण तुमचें मन, कठिण द्रवायाचें ।
शब्दसुमनांचा म्हणुनि करुनि झेला
पाठवीं मी; हा तरी वरिच झेला ॥३॥

जरा तुमच्या मी दृष्टिआड होतां
सृष्टिआडहि झालोंच काय आतां ?
वाढलें हें जरि अंतर स्थळाचें
काय प्रेमांतहि तेंच व्हावयाचें ? ॥४॥

आळसानें कां हा प्रकार झाला ?
पात्र किंवा मी नसें उत्तराला ?
राग अथवा का अजुनि नाहिं गेला ?
प्रेमसिंधुच कीं मुळीं शुष्क झाला ? ॥५॥

निकट असतां जो स्नेह दाखवीला
भासला तो तें सत्य मन्मतीला ।
आजि कळला परि खरा अर्थ त्याचा
मासला कीं तो तुझ्या अभिनयाचा ! ॥६॥

खरा नट तूं, रे नटवरा, खराच
तारतम्याचें ज्ञान परि न साच ।
अभिनयाची तुज शक्ति तर असावी
समय पाहुनि ती परी दाखवावी ॥७॥

रंगभूमी अभिनयें भूषवावी
तीच वृत्ती सर्वत्र परि नसावी ।
कालपत जरि दृष्टीस आड आला
तरि न विसरावें कधीं मित्रतेला ॥८॥

एकटयासचि तुज दोष देत नाहीं
वृत्ति सर्वांची हीच दिसत पाहीं ।
कांहिं काळें भेटतां तुम्हां कोठें
ओळखीसहि विसराल असें वाटे ॥९॥

ओघ कवितेचा येथवरी चाले
पत्र तुमचें इतक्यांत हेंच आलें ।
खिन्न माझें मन सु-प्रसन्न होत
प्रवाहाचा बदलुनी रोख जात ॥१०॥

पुढिल कार्यक्रम अजुनि ठाम नाहीं
परस्वाधिन ही गोष्ट असे पाहीं ।
छत्रपतिच्या पत्रांत परि तयाचा
कांहिं केला उल्लेख तोच वाचा ॥११॥

लेखनाचें कौशल्य फार माझें
तुझा उपहासच त्यास योग्य साजे ।
लिहित बसणें तुम्हांस नित्य पत्रें
लेखनाचें कौशल्य हेंच सारें ॥१२॥

असें वरचेवर पत्र पाठवावें
आणि प्रकृतीतें नित्य जपत जावें ।
उण्या-अधिकाचा राग नच धरावा
भूतकालासह तोहि भूत व्हावा ॥१३॥

बहुत लिहिणें वद काय याहुनीहि
विनति नित्याची लोभ असावा ही ।
काव्यदेवीतें द्यावया विराम
घेइ आज्ञा---
आपला---
मित्र,
’राम’ ॥१४॥

ओवी
मुक्काम-नागपूर शहर
वार-पवित्र गुरुवार ।
तारीख-एकोणीस नोव्हेंबर
एकोणीसशें आठचि ॥१॥

__गोविंदाग्रज [राम गणेश गडकरी]

No comments:

Post a Comment