Tuesday, 15 November 2011

रडलो असे इष्कात

हसतील ना कुसुमे जरी, ना जरी म्हणतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती आमुची नव्हे
भ्रमरा परी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही

खेळलो इष्कात आम्ही, बेधुंद येथे खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कुणाच्या लोळलो
अस्मिता इष्कात सार्या, केव्हाच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इष्क सारा विसरलो

रडलो आम्ही इष्कात, जेव्हा आम्हा रडावे वाटले
तेव्हा नव्हे इष्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले
आसूवरी अधिकार हाही, इष्कात ज्याला साधला
नुसताच नाही इष्क त्याला मोक्ष आहे साधला

बर्बादिची दीक्षा जशी इष्कात आम्ही घेतली
इष्कही बर्बाद करण्या, माघार नाही घेतली
ना रडू नुसतेच आम्ही, हाय ना नुसते करु
आहो शिवाचे भक्त आम्ही, हेही करु तेही करु

नव्हता तसा केवीलवाणा, इष्क केव्हा आमुचा
होता पुरे प्रणयात सारा, नुसता इशारा आमुचा
दोस्तहो, या अप्सरांनी नाही आम्हांला रडविले
रडविले जे काय आमुच्या संयमाने रडविले

हे खरे आहो अम्हीही इष्कात या रडलो कधी
रडलो असे इष्कात नाही नयनासही कळले कधी

__भाऊसाहेब पाटणकर

No comments:

Post a Comment