निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची...
__ इंदिरा संत
No comments:
Post a Comment